Wednesday, March 2, 2011

निळी गीटारवाजवणारा माणूस (वॊलेस स्टिव्हनससाठी)


निळी गीटारवाजवणारा माणूस
(वॊलेस स्टिव्हनससाठी)
सचिन केतकर


एके रात्री
एलसीडी आकाशात
हॅंग झालेल्या 
वितळणा-या चंद्र्कोरी खाली
पानांच्या जागी डोळे असलेल्या झाडाखाली
ऊभा होतो 
हातात
माझ्या आत्म्याची
नीळी गिटार
माझी बोटं असतात
गीटारच्या तारा


माझ्या पुढे एक
न वाहणारी नदी
त्यात लॊक झालेलं

एक चंद्रबिंब



ह्या चंद्रालाच एकवतो
माझी घारी ब्लॊन्ड गाणी
आणि काळाचं एक काळं कुत्र
इतकेच माझे श्रोते
मी विझलेल्या अमावास्येचा प्राणी


सगळ्या बुबूळांवर साठलेल्या धुळीच्या थराना
धुणारं पाणी
म्हणजेच
माझ्या नीळ्या गीटारवर
गायलेली गाणी

Tuesday, March 1, 2011

केतकर कॅटरींग सर्व्हीस


मी क्रदळीच्या पानावर माझा मेंदू
तुम्हाला वाढला
तर तुमही म्हणालात
हे तर श्राद्धाचं पिंड आहे


चायनीझ बाउल मधे माझी कलेजी वाढली


तर तुम्ही म्हणाला
स्टेरॊइड्झच्या वापरामुळे तिची चव 
पार बिघडलीय


आइसक्रीम बाउलमधे माझ्या गोट्या
तुमच्या समोर धरल्या
तर तुमही म्हणालात
त्यांची वॅर अ‍ॅन्ड टॅर जरा जास्तीच आहे


पाव भाजीच्या प्लेटमधे माझे
कुल्ले तुमच्या समोर धरले
तर तुम्ही म्हणालात
आम्हाला बटर पावचीच सवय आहे


रसगुल्ल्याच्या बाउलमधे 
माझ्या बुबूळांच्या गोट्या
तुमच्या समोर धरल्या
तर तुम्ही म्हणालात
तुमची नजरच वाईट
त्यात आम्ही काय करणार


शेवटी कवितेचा कोरा कागद
बील म्हणून तुम्हाला दाखवला
तर तुमही म्हणाला
वाह वाह क्या बात है
आणि पाच रुपयाची टिप
हातावर टेकवली


६ जाने १०:४५ रात्री

Thursday, September 30, 2010

मी भाषेला बोलताना ऎकतो: सचिन केतकर



भाषा बोलतीय
मी ऎकतोय


सगळ्यांच्या पलीकडून ती बोलतीय
शेकडो वर्षांपासून
संततधार
अखंड 
अव्याहात
भाषा बोलतीय मी ऎकतोय
लोकं तोंड फ़क्त हलवतायत
लोकाना वाटतय ते स्वत: बोलतायत
पण भाषाच बोलतीय
भाषेच्या उगमा पलिकडून


मी ऎकतोय
कित्येक नद्यांना पूर आले अन गेले
नद्यांनी कित्येकदा वाटा बदलल्या
भाषा थांबतच नाहीये
तिच्या सादेतूनच उभं होतं जग
हे घर हे झाड ही माणसं
भाषा बोलतीये 


पण ती माझ्याशी बोलतीय का?
भाषा कोणाशीही बोलत नाहीये
म्हणून ती सगळ्यांशीच बोलतीये
पण भाषा स्वत:शीच बोलतीये फ़क्त
भाषेला बोलताना मी ऎकत नाहीये
मला बोलताना भाषा ऎकतीये


कारण अनादी काळा पासून
फ़क्त भाषाच बोलतीये
आणि भाषाच ऎकतीये


१४ ओक्टोबर २००९ सकळ्चे १२:१५ 
(अप्रकाशित)

पेद्यांच्या एकतरफ़ी प्रेम प्रकरणाबद्दलचा संषिप्त अहवाल : सचिन केतकर



एक चिमणी आली
एक दाणा ऊचलला
भूरर ऊडून गेली


दुसरी चिमणी आली
एक दाणा ऊचलला
भूरर ऊडून गेली


तिसरी चिमणी आली
एक दाणा ऊचलला
भूरर ऊडून गेली


चवथी चिमणी आली
एक दाणा ऊचलला
भूरर ऊडून गेली


पाचवी चिमणी आली
एक दाणा ऊचलला
भूरर ऊडून गेली


पाचवी चिमणी आली
एक दाणा ऊचलला
भूरर ऊडून गेली


सहावी चिमणी आली
एक दाणा ऊचलला
भूरर ऊडून गेली


सातवी चिमणी आली

दश दिशा दश दशा: Sachin Ketkar

१)
ह्या दहा तोंडी जगाच्या बेंबीतलं अमृत 
वाळलय केव्हाच
मी माझी लाबंसडक आसूरी बोटं
जगाच्या बेंबीवर ठेवतो
अन स्वीच ऑन करतो
पण मला त्याची बीप ऐकू येत नाही
मला वाटत केव्हाच क्रॅश झाल्यात
त्याच्या दहा हजार खिडक्या


२)
तुम्ही म्हणता रावण एकच होता
त्याच्या जगाला एकच अर्थ होता
पण खरतर त्याच्या
एक एक आनंदही दशानंद होता
त्याच्या दु:खालाही दहा दोकी होती
तो एकाच विनोदावर दहा पदधतीनं हसायचा
तो त्याच्या एक एक  दु:खावर
दहा वेगळ्या पदधतीनं रडायचा


३)
सांगा तुमच्या त्या एक तोंड्या रामाला
कि आयुष्यात वाट्टेल ते कर
पण कविता बिविता लिहिण्याच्या 
भानगडीत मात्र पडू नकोस
असल्या भानगडी
आमच्या सारख्यांवर सोडून दे
अन खुशाल जावुन बूड
तुझ्या त्या एक मूखी शरयूत


४)
तुमच्या पेक्षा दहापटीनं जग मी पह्यायलय
सगळ्याच गोष्टींचे दहा चेहरे
सगळ्याच चेहर्यांच्या दहा बाजू
मी पाह्यल्यात स्पष्टपणे
मी माझ्या वीस डोळ्यानी


आता तुम्हीच सांगा
मी कसा समजावू तुम्हाला माझं जग
तुमच्या एकमूखी भाषेत


कसं समजावू तुम्हाला
माझ्या सीते बद्द्लच्या भावना?
कसं समजावू तुम्हाला
माझ्या बहिणीची विटंबना पाहून
मला काय वाटलं ते?


माझी मात्रुभाषाच दशवचनी आहे
तर कशी काय कविता करू
तुमच्या त्रिवचनी भाषेत?


मला समजण्यासाठी
तुमच त्रिपद लॉजीक कसं चालणार


कसा चालणार जैनांचा
सप्त भंगी न्याय


आधी शोध लावा
दश पदी सायलॉगीझमचा
शोध लावा आधी
एखाद्या दशवचनी बोलीचा


५)
वालमिकीला जरी जमल असेल लिहिणं
रघुनाथाचं सपाट एकमुखी चरित्र
पण माझी ऑथॉराइझड बायोग्राफी 
लिहीण्याच काम क्रुपया 
मात्र व्यासांच सोपा
अन दहा गणपतीनां 
स्टेनोग्राफर म्हणून लावा
ह्या महालंकेच्या रचनेसाठी



या माझ्या महालात
पहा माझी ही वेल फ़रनिश्ड बाथरूम
इथे दहा आरसे का आहेत
किंवा दहा दात घासायाचे ब्रश का आहेत
दहा वेगवेगळ्या फ़्लेवरचे माऊथ फ़्र्शनर का आहेत
दहा टंग क्लीनर का आहेत
असले मुर्खासार्खे प्रश्न तुमहाला पड्णार नाही
अशी अपेक्षा आहे.


सोडा तुमचा तो
रामनामाचा फ़ॉर्म्यूला
आणि ओळखा मला
तुमच्या अंतरीचा खरा देव म्हणून


कारण मी एक डोक्यानी
किमान दहा चॅनलस पाहू शकतो
एकाच वेळेस
दुकानातले दहा ब्रॅंड चाळू शकतो
एकत्र एकाच वेळेस
मी किमान दहा लोकांशी चॅट करू शकतो
एकत्र एकाच वेळेस 
मी वीस कानांवर वीस मोबाईल चिकटवून
वीस लोकांशी वीस वेगळ्या विषयांवर
गप्पा मारू शकतो.


माझे  सर्व दहा आत्मे ड्यूअल कोर आहेत
मल्टी टास्कींग
माझा स्वभाव आहे.



माझ्या आईला 
दोनच स्तनं होती
दुर्दैवानी सग्ळ्याच बायकाना
दोनच स्तनं अस्तात
म्हणून मला एकाच वेळेस
किमान दहा बायका लागतात
किवां 
दहा हातांची दहा स्तनांची 
एकसंध एक बाइ लागते
पण शंभूनाथानं
असल्या बायका न बनवून
स्त्री जातीवर उपकारच केलाय
असं मला वाटतं
जर त्यानं अश्या बायका खरंच बनवली असती
तर तिच्यावर
आपण दहा पटीनं अत्याचार केले असते.


असो
माण्साला जरी एकच अवयव असलं
तरी त्याच्या भूकेचे दहा प्रकार असतात
त्याच्या तहानेला दहा चेहरे असतात
हे सगळे प्रकार महा अवगत असल्यामुळे
मी म्हातारपणी लिहून ठेवीन
दहा तोंडी माणसांठीच
दशसुत्री कामसुत्र


आजच बुक करा
तुमची प्रत
आणि प्री-पबलीकेशन डिस्काऊन्ट मिळ्वा
मा्झी स्वाक्षरी असलेली कॉपी


दहा अटी अर्थातच लागू.





एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल
कि ही आजची झगमगीत सुवर्ण नगरी 
म्हणजे माझं साम्राज्य 


दहा ही दहा दिशांवर लागलेत
माझे क्लोझ सर्कीट कॅमॅरा
तुमही मॉलमधे काय करता
किवा करत नाही
ह्याची इथम्बूत माहीती माझ्या कडे आहे


हे जग म्हणजे मी बनवलेलं
वर्तुलाकार तुरुगं आहे
तुम्ही सगलेच माझे कैदी आहात
माझे असंख्य कॅमॅरे
तुमच्या प्रत्येक हालचालीवर
तुमच्या प्रत्येक विचारांच्या कंपनावर
बारीक लक्ष्य ठेवून आहेत
तुम्ही जरा इकड्चे तीकडे झालात
तर तुमची गाठ माझ्याशी आहे



पण फ़क्त मलाच माहित आहे
माझी खरी शोकंतीका 
माझं मर्म कधीच सापडलं नाही
तुमच्या एकमुखी रामाला
माझी बेंबी कधीच सापडली नाही
त्याच्या सोवळ्या ब्रह्मास्त्राला
कारण माझी बेंबी कुठे आहे
हे मलाच माहीत नाही


माझ्या हृदयालादेखील
दहा तोंडं फ़ुटतात
मी रडत बसतो
दहा तोंडी काळोखात
माझ्या वीस वेगळ्या अश्रूतून
निर्माण होते शरयू
रडून रडून स्कीझोफ़्रेनीक झालय़
हे माझं काळीज




१०
तुच शोध 
माझ्या एका तोंडातून निघतं


माझी हरवलेली नाभी
आणी सोडव एकदाचा मला


माझ्या दहा आतम्यांपासून


नाहीतर
एखाद्या हताश सामूरायासारखी
मला करावी लागेल शेवटी
पोस्टमॉडर्न हाराकिरी


(जरासंधाच्या ब्लोग्वरचे काही अंश मधून  पान.१ )

Wednesday, September 29, 2010

टॉम ऍन्ड जेरी शो :सचिन केतकर



इतका वेळ्च कुठ्य आपल्या कडे
जेव्हा मी इक्डे तिकडे पळत असतो
तेव्हा तु तुझ्या पंज्यात
पकडतेस माझी शेपूट
जेव्हा तुझ्यावर मी ऊडी मारतो
तेव्हा तु गायब होतेस
तुझ्या बिळात


हे असच चालू राहणार का
आपली सगळी यंत्र
नादूरूस्त होइस्तर
सगळे कारखाने बंद होइस्तर
सगळे स्पॅरपार्टस
गंजून खलास होइस्तर ?


शेवटी अर्थतातच
कोणत्याही नदीत सोडल्या
आपल्या अस्थी तरीही
समुद्रात जाऊन 
मिसळणारच कि नाही एकमेकात
आपले पार्थीव ?


पण ह्याचा अर्थ
इतका वेळ आपण पहातच रहायची का
एकमेकांची सत्व परिक्षा ?


केव्हाच संपेल आपल्या मीठीचा आवेश
कमरेतला जोम


अता तरी संपवूया आपण
एकमेकांची परिक्षा


अता तरी जाहीर करूया
आपला निकाल

Tuesday, September 28, 2010

रिव्हॊलव्हर दारुच्या ग्लासात बुडवा : सचिन केतकर



सर्वात आधी
रिव्हॊलव्हर दारुच्या ग्लासात बुडवा
ह्यानं नशा काही औरच येतो.
रिव्हॊलव्हर बारबालेच्या स्ननावर पुसा
एक हात तिच्या कुल्यावर ठेउन
दुसर्या हातानं घोडा 
स्वतःच्या कपाळावर ठेवायचा
च्यायला आपण कवितेच्याच गेम करयचा 
कॊंन्डॊम चढवतात तसा 
घोड्यावर सायलंसर चढवा
अन थंडपणे एक गॊळी 
शब्दाच्या कण्यात उतरवा
मग पहा भाषेच मुकं जनावार कस तडफ़डतं
मग हे मरतुकडं वासरू
धड मरूही शकणार नाही 
कि धड हंबरडाही फ़ोडू शकणार नाही
जस जसा सुर्य घसरत जाइल
तस तसे शब्दांचे कावळे
गोळा होतील  आपल्या छतावर


(अप्रकाशित)