Thursday, September 30, 2010

दश दिशा दश दशा: Sachin Ketkar

१)
ह्या दहा तोंडी जगाच्या बेंबीतलं अमृत 
वाळलय केव्हाच
मी माझी लाबंसडक आसूरी बोटं
जगाच्या बेंबीवर ठेवतो
अन स्वीच ऑन करतो
पण मला त्याची बीप ऐकू येत नाही
मला वाटत केव्हाच क्रॅश झाल्यात
त्याच्या दहा हजार खिडक्या


२)
तुम्ही म्हणता रावण एकच होता
त्याच्या जगाला एकच अर्थ होता
पण खरतर त्याच्या
एक एक आनंदही दशानंद होता
त्याच्या दु:खालाही दहा दोकी होती
तो एकाच विनोदावर दहा पदधतीनं हसायचा
तो त्याच्या एक एक  दु:खावर
दहा वेगळ्या पदधतीनं रडायचा


३)
सांगा तुमच्या त्या एक तोंड्या रामाला
कि आयुष्यात वाट्टेल ते कर
पण कविता बिविता लिहिण्याच्या 
भानगडीत मात्र पडू नकोस
असल्या भानगडी
आमच्या सारख्यांवर सोडून दे
अन खुशाल जावुन बूड
तुझ्या त्या एक मूखी शरयूत


४)
तुमच्या पेक्षा दहापटीनं जग मी पह्यायलय
सगळ्याच गोष्टींचे दहा चेहरे
सगळ्याच चेहर्यांच्या दहा बाजू
मी पाह्यल्यात स्पष्टपणे
मी माझ्या वीस डोळ्यानी


आता तुम्हीच सांगा
मी कसा समजावू तुम्हाला माझं जग
तुमच्या एकमूखी भाषेत


कसं समजावू तुम्हाला
माझ्या सीते बद्द्लच्या भावना?
कसं समजावू तुम्हाला
माझ्या बहिणीची विटंबना पाहून
मला काय वाटलं ते?


माझी मात्रुभाषाच दशवचनी आहे
तर कशी काय कविता करू
तुमच्या त्रिवचनी भाषेत?


मला समजण्यासाठी
तुमच त्रिपद लॉजीक कसं चालणार


कसा चालणार जैनांचा
सप्त भंगी न्याय


आधी शोध लावा
दश पदी सायलॉगीझमचा
शोध लावा आधी
एखाद्या दशवचनी बोलीचा


५)
वालमिकीला जरी जमल असेल लिहिणं
रघुनाथाचं सपाट एकमुखी चरित्र
पण माझी ऑथॉराइझड बायोग्राफी 
लिहीण्याच काम क्रुपया 
मात्र व्यासांच सोपा
अन दहा गणपतीनां 
स्टेनोग्राफर म्हणून लावा
ह्या महालंकेच्या रचनेसाठी



या माझ्या महालात
पहा माझी ही वेल फ़रनिश्ड बाथरूम
इथे दहा आरसे का आहेत
किंवा दहा दात घासायाचे ब्रश का आहेत
दहा वेगवेगळ्या फ़्लेवरचे माऊथ फ़्र्शनर का आहेत
दहा टंग क्लीनर का आहेत
असले मुर्खासार्खे प्रश्न तुमहाला पड्णार नाही
अशी अपेक्षा आहे.


सोडा तुमचा तो
रामनामाचा फ़ॉर्म्यूला
आणि ओळखा मला
तुमच्या अंतरीचा खरा देव म्हणून


कारण मी एक डोक्यानी
किमान दहा चॅनलस पाहू शकतो
एकाच वेळेस
दुकानातले दहा ब्रॅंड चाळू शकतो
एकत्र एकाच वेळेस
मी किमान दहा लोकांशी चॅट करू शकतो
एकत्र एकाच वेळेस 
मी वीस कानांवर वीस मोबाईल चिकटवून
वीस लोकांशी वीस वेगळ्या विषयांवर
गप्पा मारू शकतो.


माझे  सर्व दहा आत्मे ड्यूअल कोर आहेत
मल्टी टास्कींग
माझा स्वभाव आहे.



माझ्या आईला 
दोनच स्तनं होती
दुर्दैवानी सग्ळ्याच बायकाना
दोनच स्तनं अस्तात
म्हणून मला एकाच वेळेस
किमान दहा बायका लागतात
किवां 
दहा हातांची दहा स्तनांची 
एकसंध एक बाइ लागते
पण शंभूनाथानं
असल्या बायका न बनवून
स्त्री जातीवर उपकारच केलाय
असं मला वाटतं
जर त्यानं अश्या बायका खरंच बनवली असती
तर तिच्यावर
आपण दहा पटीनं अत्याचार केले असते.


असो
माण्साला जरी एकच अवयव असलं
तरी त्याच्या भूकेचे दहा प्रकार असतात
त्याच्या तहानेला दहा चेहरे असतात
हे सगळे प्रकार महा अवगत असल्यामुळे
मी म्हातारपणी लिहून ठेवीन
दहा तोंडी माणसांठीच
दशसुत्री कामसुत्र


आजच बुक करा
तुमची प्रत
आणि प्री-पबलीकेशन डिस्काऊन्ट मिळ्वा
मा्झी स्वाक्षरी असलेली कॉपी


दहा अटी अर्थातच लागू.





एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल
कि ही आजची झगमगीत सुवर्ण नगरी 
म्हणजे माझं साम्राज्य 


दहा ही दहा दिशांवर लागलेत
माझे क्लोझ सर्कीट कॅमॅरा
तुमही मॉलमधे काय करता
किवा करत नाही
ह्याची इथम्बूत माहीती माझ्या कडे आहे


हे जग म्हणजे मी बनवलेलं
वर्तुलाकार तुरुगं आहे
तुम्ही सगलेच माझे कैदी आहात
माझे असंख्य कॅमॅरे
तुमच्या प्रत्येक हालचालीवर
तुमच्या प्रत्येक विचारांच्या कंपनावर
बारीक लक्ष्य ठेवून आहेत
तुम्ही जरा इकड्चे तीकडे झालात
तर तुमची गाठ माझ्याशी आहे



पण फ़क्त मलाच माहित आहे
माझी खरी शोकंतीका 
माझं मर्म कधीच सापडलं नाही
तुमच्या एकमुखी रामाला
माझी बेंबी कधीच सापडली नाही
त्याच्या सोवळ्या ब्रह्मास्त्राला
कारण माझी बेंबी कुठे आहे
हे मलाच माहीत नाही


माझ्या हृदयालादेखील
दहा तोंडं फ़ुटतात
मी रडत बसतो
दहा तोंडी काळोखात
माझ्या वीस वेगळ्या अश्रूतून
निर्माण होते शरयू
रडून रडून स्कीझोफ़्रेनीक झालय़
हे माझं काळीज




१०
तुच शोध 
माझ्या एका तोंडातून निघतं


माझी हरवलेली नाभी
आणी सोडव एकदाचा मला


माझ्या दहा आतम्यांपासून


नाहीतर
एखाद्या हताश सामूरायासारखी
मला करावी लागेल शेवटी
पोस्टमॉडर्न हाराकिरी


(जरासंधाच्या ब्लोग्वरचे काही अंश मधून  पान.१ )

1 comment: